विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:11 IST2018-07-31T16:08:43+5:302018-07-31T16:11:40+5:30
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू, दिराविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा ३१ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी दाखल केला.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा !
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू, दिराविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा ३१ जुलै रोजी शिरपूर पोलिसांनी दाखल केला. आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
तिवळी येथील वर्षा गजानन कड (३०) ही महिला ३० जुलै रोजी फवारणीसाठी पाणी आणताना गोवर्धन शेतशिवारातील विहिरीत पडली होती. यामध्ये तिचा मृत्यु झाला. सदर प्रकरणी मृतक महिलेचा पती गजानन कड यांच्या फिर्यादीवरून ३० जुलै रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मृतक महिलेचा भाऊ नामदेव रामकिसन शेळके रा. पन्हाळा ता. पूसद यांनी बहिणीचा मृत्यू सासरच्या मंडळीमुळे झाल्याची फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. सासरची मंडळी ही माहेरवरून पैसे आणण्यासाठी बहिणीचा नेहमी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंउळीने तिला विहिरीत लोटून दिले व त्यातच तिचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी पती गजानन कड, सासू व दिर भूजंग कड अशा तिघांविरूद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी गजानन कड यास अटक केली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे करीत आहेत.