महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा, नव्या जोडण्या रखडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:54 IST2018-12-06T13:52:41+5:302018-12-06T13:54:21+5:30
वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत.

महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा, नव्या जोडण्या रखडल्या
शिरपूर जैन (वाशिम) : वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील महावितरण कार्यालयात शेकडो ग्राहकांनी जून महिन्यापूर्वी अर्ज सादर करून कोटेशनचा भरणा केला आहे. कोटेशन भरल्यामुळे सबंधित ग्राहकांना किमान महिनाभरात वीज जोडणी मिळणे अपेक्षित आहे; परंतु नव्या वीज जोडण्यासाठी महावितरणकडे वीज मीटरच उपलब्ध नाहीत.
त्यामुळे शिरपूर परिसरासह इतर ठिकाणच्या नव्या वीज जोडण्या रखडल्या असून, ग्राहकांना पैसे भरूनही वीजजोडणीअभावी अंधारातच रात्र काढावी लागत आहे. शिरपूर जैन येथील १०० हून अधिक लोकांनी नव्या वीज जोडणीसाठी आॅनलाइन भरले आहेत. नव्या वीज जोडण्यांसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांची मागणी पूर्ण करून त्यांना वीज जोडणी देणे आवश्यक असताना महावितरणच्या अधिका-यांनी अद्याप वीज मीटर उपलब्ध करण्याची तसदीही घेतली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
महावितरण वाशिमकडे नवे वीज मीटर उपलब्ध झाले आहेत. आता ज्या ग्राहकांनी कोटेशन भरले आहेत. त्यांना प्रथम प्राधान्याने वीज जोडणी देण्यासाठी शिरपूर येथील कार्यालयाकडे मीटर पाठविण्यात येतील. -आर. जी. तायडे,कार्यकारी अभियंता, महावितरण वाशिम