जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण
By संतोष वानखडे | Updated: February 12, 2024 18:34 IST2024-02-12T18:34:30+5:302024-02-12T18:34:49+5:30
काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सहभागी होणार असल्याच्या रंगल्यात चर्चा

जिल्ह्यातील आमदारांसह पदाधिकारी काँग्रेससोबतच, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर स्पष्टीकरण
वाशिम: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात पडसाद उमटत आहेत. वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेसच्या एकमेव आमदारासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेससोबत असून, तसे आमदारांनी स्पष्ट केले.
गत दीड वर्षांत राज्याच्या राजकारणात दोन प्रमुख भूकंप झाले. काँग्रेसचा एक मोठा गट महायुतीत सहभागी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. चव्हाण यांच्यासोबत काॅंग्रेसचे काही आमदार असून, त्यामध्ये रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांचेही नाव आले होते. मात्र, झनक यांनी तातडीने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही, असे ते म्हणाले. झनक यांनी एक व्हिडीओ जारी केला असून, व्हाटस ॲप स्टेट्सही ठेवले होते. यामध्ये ते म्हणतात की, आज सकाळपासून माझ्या राजीनाम्याबाबतची जी बातमी समोर येत आहे, ती चुकची आहे. काॅंग्रेस पक्षाने आमच्या झनक कुटुंबियावर अतिशय प्रेम केले, काॅंग्रेसने आम्हाला भरपूर दिले आहे. काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही, असे म्हणत झनक यांनी आपण काॅंग्रेस पक्षातच असल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व काॅंग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील आपण काॅंग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले.
..........
कोट
माझ्या राजीनाम्याबाबतचे वृत्त खोटे आहे. काॅंग्रेस पक्षाने आम्हाला भरपूर दिले आहे. काॅंग्रेस पक्ष सोडून जाण्याचा विचार मनात कधीच येणार नाही.
- अमित झनक, आमदार
रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघ