Maratha Reservation Protest: वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने करवून घेतले मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:40 IST2018-08-05T15:39:18+5:302018-08-05T15:40:51+5:30
वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने मुंडन करवून घेतले.

Maratha Reservation Protest: वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने करवून घेतले मुंडन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धार आता अधिकच तीव्र झाल्याचे दिसत आहे. आरक्षण देण्यास शासनस्तरावरून प्रचंड दिरंगाई बाळगण्यात येत असल्याचा मुद्दा समोर करून वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात शेकडो मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने मुंडन करवून घेतले. यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यासोबतच पोवाडा गावून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीवरून जिल्ह्यात विविध ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको, जेलभरो, ठिय्या यासह विविध स्वरूपातील आंदोलने सुरूच असून समाजबांधवांनी ४ ते ९ आॅगस्ट या कालावधीत आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार, वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासूनच ठिय्या आंदोलन सुरू असून ठरल्यानुसार ५ आॅगस्टला वाशिम शहराच्या पाटणी चौकात शेकडो समाजबांधवांनी एकत्र येत सामूहिकरित्या मुंडन करवून घेत शासनाने आरक्षणाप्रती बाळगलेल्या उदासिन धोरणांचा निषेध केला. गोंधळ, जागरण, भजन-कीर्तन आणि मुंडन हे आंदोलन येथे आगळेवेगळे ठरले.