Mahaline Online adhar center washim | महाआॅनलाईनकडून आधार कें द्रधारकांची गळचेपी
महाआॅनलाईनकडून आधार कें द्रधारकांची गळचेपी


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात महाआॅनलाईनच्यावतीने आधार केंद्रधारकांची गळचेपी करण्यात येत आहे. आधार केंद्र यापूर्वी बंद ठेवल्याबाबत ५० हजार रुपये दंडासह अतिरिक्त ५० हजार अनामत रक्कम म्हणून जमा करण्याची अट त्यांना घालण्यात आली असून, या अटीमुळे आधारकेंद्र चालविण्यास संबंधितांचा नकार येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आधार नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया वांद्यात सापडली आहे.
वाशिम जिल्ह्यात ‘युनिक आयडेंटिफिकेशन आॅथरिटी आॅफ इंडिया’च्यावतीने (यूआयडी) आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले होेते. यासाठी सुरुवातीला केंद्रशासनाकडून निवडण्यात आलेल्या ‘सीएमएस कॉम्प्युटर प्रा. लि.’च्यावतीने संबंधित केंद्रधारकांनाआधार नोंदणी किट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सर्व केंद्रावर आधार नोंदणीसाठी निर्धारित ३० रुपये शुल्क आकारून नागरिकांची आधार नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. सुरुवातीची दोन चार वर्षे या कें द्रांवर सुरळीत आधार नोंदणी सुरू असताना या केंद्रांवर नागरिकांकडून नियमबाह्य पद्धतीने जादा शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार संबंधित आधार नोंदणी केंद्रधारकाला ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला. जिल्ह्यात पुन्हा आधार नोंदणीचे काम करण्यासाठी २४ अर्ज प्राप्त झाले असून, यात पूर्वी बंद केलेल्या आधारकेंद्रांचाही समावेश आहे. आता आधार नोंदणी, दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या महॉआॅनलाईनच्यावतीने आधारकेंद्र धारकांना नागरिकांच्या तक्रारीची कारवाई म्हणून ५० हजार रुपये दंड, तसेच ५० हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्याची सक्ती करण्यात येत आहे. एकाचवेळी एक लाख रुपये भरणे शक्य होत नसल्याने अनेकांकडून या प्रकाराला छुपा विरोध होत आहे. त्यामुळे आधार नोंदणी सुरू करण्यासाठी २४ अर्ज प्राप्त झाले असले तरी, प्रत्यक्षात जिल्ह्यात केवळ ९ आधार केंद्रच सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आधारकार्ड नोंदणी न झालेल्या आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्यांची पंचाईत होत आहे.


आधार केंद्रधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यूआयडीकडूनच ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला असून, ती रक्कम त्यांना भरून अनामत रक्कम म्हणून ५० हजार रुपये जमा करण्याच्याही सुचना आहेत. महाआॅनलाईन केवळ अमलबजावणी करीत आहे. शिवाय दंडाची रक्कमही कमीशनमधून वसुल करण्याची सुचनाही आहे.
-सागर भुतडा
जिल्हा समन्वयक, महाआॅनलाईन (वाशिम)


Web Title: Mahaline Online adhar center washim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.