'लोकमत'चा दणका : कोविड केअर सेंटरमध्ये नवीन काचा, खिडक्या बसविल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 19:42 IST2021-06-02T19:42:14+5:302021-06-02T19:42:29+5:30
Washim News : ‘लोकमत’ने १ जून रोजी सचित्र वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

'लोकमत'चा दणका : कोविड केअर सेंटरमध्ये नवीन काचा, खिडक्या बसविल्या !
वाशिम : वाशिम शहरातील कोविड केअर सेंटर असलेल्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या तर काचा फुटलेल्या असल्याने पावसाळ्यात रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १ जून रोजी सचित्र वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी काचा, खिडक्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित सर्व यंत्रणांना दिले. २ जूनपासून नवीन काचा, खिडक्या बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला.
सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या जिल्ह्यातील निवासी शाळा व वसतिगृहाच्या इमारती कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. वाशिम शहरातील सिव्हिल लाईनस्थित कोविड केअर सेंटरच्या इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या तर काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यासह पाऊस आला तर थेट खोलीत पाणी शिरते. यामुळे रुग्णांची तारांबळ उडते. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जात असल्याने पावसाळ्यात इमारतींमध्ये पाणी शिरणार नाही, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने १ जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी या वृत्ताची दखल घेत तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणांना दिले. बुधवार, २ जूनपासून खिडक्या तसेच काचांच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले. नवीन काचा बसविण्यात येत असून, कोविड केअर सेंटरमध्ये पाणी शिरणार नाही, याची दक्षताही घेण्यात येत आहे.