‘किचनशेड’मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:12 IST2017-08-21T01:12:39+5:302017-08-21T01:12:56+5:30

देपूळ: इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्ग केवळ दोन खोल्यांमध्ये दाटीने बसविल्या जात आहेत, तर एक वर्ग चक्क पोषण आहार शिजविल्या जाणार्‍या किचन शेडमध्ये भरविण्याचा प्रकार वाशिम तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

Lessons for students in Kitchen shed! | ‘किचनशेड’मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे!

‘किचनशेड’मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे!

ठळक मुद्देमाळेगाव येथील प्रकारजि.प. शाळा इमारतीची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ: इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्ग केवळ दोन खोल्यांमध्ये दाटीने बसविल्या जात आहेत, तर एक वर्ग चक्क पोषण आहार शिजविल्या जाणार्‍या किचन शेडमध्ये भरविण्याचा प्रकार वाशिम तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 
वाशिम तालुक्यातील पांडव उमरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या माळेगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना ३ शिक्षकांकडून ज्ञानदान करण्यात येते. पूर्वी या शाळेत तीन वर्गखोल्या होत्या; परंतु यातील एक वर्गखोलीचे छत वार्‍या-वादळाने उडाले. त्यानंतर गेल्या  एक दीड वर्षापासून ही वर्गखोली त्याच स्थितीत असल्याने येथील चारही वर्ग दोनच खोल्यांमध्ये भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे अपुर्‍या वर्गखोल्यांअभावी या शाळेतीला १ वर्ग कधी-कधी किचन शेडमध्ये भरविल्या जातो. त्यामुळे खिचडी शिजवताना विद्यार्थी बाहेर काढले जातात व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रांगणात पोषण आहार घेतल्यानंतर  हे विद्यार्थी पुन्हा किचन शेडमध्ये  बसविले जातात. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याशिवाय शाळेच्या मध्यभागातूनच पांदन रस्ताही जातो. त्यामुळे गावकरी या शाळेला प्रवेशद्वारही बसवू देत नाहीत. या शाळेला अर्धवट कुंपणभिंत असून, उर्वरित बाजूला चक्क काट्यांचे कुंपण घातले आहे. 
या  शाळेची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून करण्यात यावी, असे ‘आपले गाव, आपला विकास’ या योजनेच्या  विकास आराखड्यामध्ये तरतूद केली असतानाही ग्रामपंचायतने शाळेची त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे  गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि लोकवर्गणी किंवा दानाच्या माध्यमातून शाळेला जागा उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथे दोन वर्गखोल्यांचे काम युद्धपातळीवर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे. दरम्यान, या शाळेला दोन वर्ग खोल्या व पूर्ण कुंपणभिंत बांधण्याची मागणी उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे या मागणीकडेही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष झाले.  यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

अंगणवाडीची इमारतही अनेक दिवसांपासून शिकस्त 
माळेगाव येथील अंगणवाडी इमारतही गेल्या अनेक दिवसांपासून शिकस्त झाली असून, याच इमारतीच्या व्हरांड्यात अंगणवाडी भरविली जाते. येथे येणार्‍या चिमुकल्यांच्या भविष्याचा, आरोग्याचा आणि जिवाचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथे नवी अंगणवाडी इमारत ंउभारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही गावकरी वर्ग करीत आहे. 

 वादळी वार्‍यामुळे दुरवस्था झालेल्या वर्गखोलीबाबत वरिष्ठांना कळविले आहे, तसेच दुरुस्तीबाबत गतवर्षी ग्रामपंचायतच्या सभेत ‘आपले गाव आपला विकास’ आराखडा अंतर्गत नोंद केली आहे. 
- राधेश्याम गव्हाणे, मुख्याध्यापक, माळेगाव जि.प. शाळा

 या वर्गखोली दुरुस्ती तथा अंगणवाडी दुरुस्तीची मागणी आम्ही गावकर्‍यांच्यावतीने ‘आपले गाव आपला विकास’ आराखड्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट केली; परंतु ती ग्रामपंचायतने अद्याप दखल घेतली नाही. 
- संतोष अवगण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष 

Web Title: Lessons for students in Kitchen shed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.