पूरभूर शेतशिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 17:56 IST2019-12-24T17:55:56+5:302019-12-24T17:56:02+5:30
एका शेतात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

पूरभूर शेतशिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील पूरभुर शेतशिवारात एका शेतात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
गत २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी बिबट्या आढळून आल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विशेष: मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात बिबट्या आढळून येत आहे. मालेगाव तालुक्यातच १० दिवसांपूर्वी बिबट्याने एका जनावराची शिकारही केल्याची माहिती समोर आली होती. आता शेलुबाजारनजीक असलेल्या पूरभूर शिवारात मृतावस्थेत बिबटया आढळून आल्याने जिल्ह्याच्या काही भागात बिबट्याचा वावर असल्याच्या वृत्ताला चांगलाच दुजोरा मिळाला. अन्नाच्या शोधात निघालेल्या बिबट हा पूरभूर शेतशिवारातील सुमेध इंगोले यांच्या शेतात आढळून आला. मंगळवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी इंगोले शेतात गेले असता त्यांना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यांनी वनमजुराला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाºयांचा ताफा घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. सदर बिबट्याचा मृत्यु संशयास्पद असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या परिसरात काटेपुर्णा अभयारण्य असल्यामुळे येथे नेहमीच बिबट्याचा वावर आढळून येत असतो. मृतावस्थेत बिबट आढळल्याची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी सदर बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजाच्या सदस्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले. शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचाºयांनी कारंजा येथे हलविला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेलुबाजारसह पूरभूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.