टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीसाठी खासदारासह दाेन आमदारांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:02+5:302021-07-31T04:41:02+5:30
वाशिम : शहरातील टेम्पल गार्डन व नाट्यगृहावर जवळपास २० काेटी रुपये खर्च हाेऊनही काम पूर्णत्वास आलेले नाही. याकामात माेठ्या ...

टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीसाठी खासदारासह दाेन आमदारांचा पुढाकार
वाशिम : शहरातील टेम्पल गार्डन व नाट्यगृहावर जवळपास २० काेटी रुपये खर्च हाेऊनही काम पूर्णत्वास आलेले नाही. याकामात माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याच्या चाैकशीसाठी खासदारासह एक विद्यमान आमदार व एका माजी आमदाराने दंड थाेपटले आहे. यामुळे नगरपरिषद प्रशासनासह कंत्राटदार चांगलेच अडचणीत आल्याचे बाेलले जात आहे.
गत आठवड्यात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा नियोजित होता. यावेळी वाशिमच्या खा. भावनाताई गवळी, आ. लखन मलिक आणि माजी आ. ॲड. विजयराव जाधव यांनी पालकमंत्र्यांची संयुक्त भेट घेऊन स्थानिक टेम्पल गार्डन आणि नाट्यगृह यात झालेला भ्रष्टाचार आणि अनियमिततेचा पाढाच वाचला. ही कामे २०११ पासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यातील बरीचशी कामे पूर्णत्वाकडे असल्याचा दावा न. प. चा असून प्रत्यक्षात पाहणी केली तेव्हा झालेली सर्व कामे नासधूस आणि उद्ध्वस्त झाली आहेत. जवळजवळ वीस कोटींची ही कामे अशा दुरवस्थेत आहेत की, त्यामुळे जनतेचा कोट्यवधींचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी खा. भावना गवळी, आमदार लखन मलिक व माजी आमदार विजयराव जाधव यांनी केली. प्रथमच विकास कामासाठी शिवसेनेच्या खासदार व भाजपचे आमदार एकत्र आल्याने विकास कामांना गती मिळणार असल्याची चर्चा नागरिकांत ऐकण्यास मिळत आहे.
................
दाेषींवर निश्चित कारवाई : पालकमंत्री देसाई
टेम्पल गार्डन व नाट्यगृह कामाची विभागीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल व वसुली देखील करण्यात येईल. याबाबत आपण जिल्हाधिकारी यांना सूचितही केले आहे. दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराच्या चाैकशीपेक्षा हे काम त्वरित पूर्ण हाेणे गरजेचे आहे. टेम्पल गार्डन जनसेवेत रुजू व्हावे, याकरिता आपण पुढाकार घेतला आहे.
- विजयराव जाधव, माजी आमदार
टेम्पल गार्डनच्या भ्रष्टाचाराची चाैकशी हाेऊन कामात दिरंगाईचे कारण शाेधून दाेषींवर कारवाई तसेच त्वरित टेम्पल गार्डन सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा
- लखन मलिक, आमदार
२०११ पासून सुरू असलेले काम तब्बल १० वर्षांचा काळ उलटूनही पूर्ण हाेत नाही, याला काय म्हणावे. काेट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात पडले आहे. याला जबाबदार काेण, याची चाैकशी झाली पाहिजे. याेग्य नियाेजन नसल्याने आज शहरवासी गार्डनपासून वंचित आहेत.
- भावनाताई गवळी, खासदार