गेल्या पंधरा दिवसांपासून धनज व परिसरातील इतर गावांमध्ये डेंग्यू व टायफाईडसदृश आजाराची साथ पसरली असून घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे दिसून येत असलेल्या रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी दवाखान्यांकडे रुग्णांनी धाव घेतली असून खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाली आहेत. साथीच्या आजारामध्ये वयोवृद्धापासून लहान बालकांचाही समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण चांगल्या औषधोपचारासाठी शहरी भागाकडे धाव घेत आहेत. असे असताना धनज ग्रामपंचायतीकडून अद्यापपर्यंत कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. डास प्रतिबंधक धूर फवारणी, नाल्या सफाईकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
................
धनज बु. परिसरात गेल्या काही दिवसांत साथीच्या आजारांचे प्रस्थ बळावले आहे. त्यानुषंगाने पुरेसा औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविल्या जातील.
- डॉ. सागर म्हस्के, वैद्यकीय अधिकारी, धनज बु.