वाशिम जिल्ह्यात छुप्यापद्धतीने अवैध लाकूड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:54 IST2019-05-14T15:53:55+5:302019-05-14T15:54:01+5:30
वाशिम: पर्यावरणाच्या ºहासामुळे उष्णतामानाने उचांकी पातळी गाठली असताना अद्यापही जिल्ह्यात सर्रास अवैध वृक्षतोड करून छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

वाशिम जिल्ह्यात छुप्यापद्धतीने अवैध लाकूड वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पर्यावरणाच्या ºहासामुळे उष्णतामानाने उचांकी पातळी गाठली असताना अद्यापही जिल्ह्यात सर्रास अवैध वृक्षतोड करून छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. वनविभाग मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याने वृक्षतोड करणाऱ्यांना मोकळीकच असल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक जंगलाचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रात बिबा, बाभुळ, ठेंभुर्णी, कडू निंब, पिंपळ, वड, पळस, पांगरा आणि सागवानासह अनेक जातीचे वृक्ष आहेत. यात सागाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वनतस्कर या सागवानाची अवैध कत्तल करण्याचे प्रकारही करीत असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले. यात वनविभागाकडून बहुतांश वेळी कार्यवाहीही करण्यात आली; परंतु अद्यापही जंगलातील वृक्षतोडीचे प्रमाण म्हणावे तेवढे कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.
सोमवार १३ मे रोजी जिल्ह्यातील विविध मार्गावर ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये प्लास्टिक आणि ताडपत्रीत झाकून लाकडांची वाहतूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमके ही लाकडे कोठून तोडून आणली, कशासाठी तोडण्यात आली, कोठे जात होती, यासह वृक्षांची कत्तल करताना वनविभागाची परवानगीही घेण्यात आली की नाही, हे कळायला मार्गच उरला नव्हता. अगदी शहरी भागातून लाकडाची अशी वाहतूक होत असतानाही पोलीस प्रशासन वा वनविभागाचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, हासुद्धा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे.
मागिल २ ते ३ महिन्यांत २० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाची चमू अवैध लाकूड वाहतुकीविरोधात कारवाईसाठी सर्तक आहे. यापुढेही कारवाई करण्यात येईल. अशा अवैध वृक्षकत्तलीवर नियंत्रणासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी वनविभागाला माहिती देणे आवश्यक आहे.
-सुमंत सोळंके
उप वनसंरक्षक, वाशिम