वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले

By नंदकिशोर नारे | Updated: June 15, 2025 10:04 IST2025-06-15T10:03:41+5:302025-06-15T10:04:19+5:30

अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सरपंच हॉटेलजवळील दुर्घटना

Horrific accident on Washim's Medshi bypass Two killed, one injured, two narrowly escape | वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले

वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले

मेडशी: अकोला–नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपासवर, सरपंच हॉटेलजवळ १४ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, कारमधील दोन प्रवासी थोडक्यात बचावले.

घटनेनुसार, आर . जे . ०९ जीसी ५४४ क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून पातूरच्या दिशेने जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम एच . ३० बीपी ८२८९  क्रमांकाच्या टँकरला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकरचा चालक शेख शोएब शेख मुजीब (वय २५, रा. गंगानगर, अकोला) आणि त्यांना भेटण्यासाठी आलेले दुसऱ्या टँकरचे चालक शेख जावेद शेख सलीम (वय ४५, रा. अर्धापूर, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात टँकरमधील क्लीनर हाफीजसोद्दीन मुजिबोद्दीन (वय ३५, रा. गंगानगर, अकोला) हे जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, ट्रकच्या जोरदार धडकेमुळे टँकर पलटी झाला आणि रस्त्यालगत उभ्या असलेल्या  एम .एच . ३७ ए एच १५३१  क्रमांकाच्या कारवर जाऊन आदळला. त्या कारमध्ये मंजीत मुंडे आणि त्यांचे साथीदार बसलेले होते. सुदैवाने, दोघेही बालंबाल बचावले; मात्र, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Web Title: Horrific accident on Washim's Medshi bypass Two killed, one injured, two narrowly escape

टॅग्स :Accidentअपघात