या गावात ६९ वर्षांपासून नाही पेटली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:44 IST2020-03-09T13:44:38+5:302020-03-09T13:44:52+5:30
रंगाची उधळणही बंद: आराध्य संताच्या देहावसानानंतर ग्रामस्थांचा त्याग

या गावात ६९ वर्षांपासून नाही पेटली होळी
लोकमत न्युज नेटवर्क
येवता बंदी (वाशिम): कारंजा तालुक्यातील इंझा वनश्री येथे गेल्या ६९ वर्षांपासून होळी पेटली नाही आणि रंगाची उधळणही झालेली नाही. गावचे आराध्य दैवत परमहंस परशराम महाराज यांचे २३ मार्च १९५१ ला होळी पौर्णिमेच्या दिवशी देहावसान झाले. त्या दिवसापासून गावकºयांनी या सणाचा त्यागच केला आहे.
कारंजा तालुक्यातील इंझा वनश्री हे एक धार्मिकवृत्तीच्या लोकांचे गाव आहे. या गावात परमहंंस परशराम महाराजांचे वास्तव्य होते. गावकरी त्यांना आराध्य दैवत मानत. त्यांच्या संस्थानवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन होत असे. पंचक्रोशीतील भाविकांची या धार्मिक कार्यक्रमांना मोठी उपस्थितीही लाभत असे. या महाराजांचे देहासान २३ मार्च १९५१ रोजी होळी पौर्णिमेच्या दिवशीच झाले. त्यामुळे इंझा वनश्रीसह परिसर शोकसागरात बुडाला. त्या दिवशी गावात एकाही घरी होळी पेटली नाही आणि रंगपंचमीही साजरी करण्यात आली नाही. ही परंपरा आजही कायम असून, होळी पौर्णिमेनिमित्त होळी न पेटवता, रंगाची उधळण न करता. परमहंस परशराम महाराज यांच्या संस्थांनमध्ये भागवत सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातून महाराजांची पालखी काढण्यात येते. पंचक्रोशीतील हजारो भाविक या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. यात्रोत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.