वाशिम जिल्ह्यात गारपीटीने २,१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:00 IST2020-01-05T15:00:25+5:302020-01-05T15:00:30+5:30
२४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

वाशिम जिल्ह्यात गारपीटीने २,१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गुरूवार, २ जानेवारीला गारपीटीसह अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले. या नैसर्गिक संकटाचा प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांना जबर फटका बसला असून २१०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. त्यानुषंगाने कृषी व महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात गतवर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे जबर नुकसान झाले होते. त्यापोटी १७९.९९ कोटी रुपयांचा मदतनिधी शासनाकडून प्राप्त झाला. त्याचे वाटप सद्या बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असतानाच पुन्हा एकवेळी २ जानेवारीला गारपीट आणि अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घालून रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मानोरा तालुक्यातील १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ अशा २४ गावांमधील २१०० हेक्टरवरील पिकांना जबर फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, हळद, तूर या पिकांचे नुकसान झाले असून सरासरी उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचे संकेत शेतकºयांकडून वर्तविण्यात येत आहे.
अवकाळी पाऊस, गारपीटीने बाधीत झालेली गावे
२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे वाशिम तालुक्यातील वारा जहाँगीर, देगाव, उमरा, जवळा यासह मानोरा तालुक्यातील वटफळ, रुईगोस्ता, शेंदूरजना, भुली, ढोणी, माहुली, पंचाळा, धानोरा, गादेगाव, सोयजना, मेहा, भुली यासह इतर गावांमधील रब्बी हंगामातील पिकांना जबर फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
वाशिम तालुक्यातील बाधीत सातही गावांमध्ये कृषी सहायकांमार्फत बाधीत पिकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात झालेल्या नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येईल.
- अभिजित देवगिरीकर
तालुका कृषी अधिकारी, वाशिम
२ जानेवारीला झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे प्रामुख्याने मानोरा तालुक्यातील सर्वाधिक १७ आणि वाशिम तालुक्यातील ७ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले. उर्वरित मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव या चार तालुक्यांमधील पिके सुस्थितीत आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम