Gramsevak's determination to intensify the non-cooperation movement | असहकार आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामसेवकांचा निर्धार
असहकार आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामसेवकांचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जुलैपासून ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, १९ जुलैपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, सदर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धार ग्रामसेवकांनी व्यक्त केला. 
ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या रखडल्या असून, कंत्राटी ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव अद्याप परत केली नाही आदी आरोप करीत न्यायोचित मागणीसाठी ग्रामसेवकांनी यापूर्वी १० ते १७ मे दरम्यान असहकार आंदोलन पुकारले होते. दोन महिन्यात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. किरकोळ स्वरुपाचा तीन मागण्यांचा अपवाद वगळता उर्वरीत मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही नसल्याने ग्रामसेवक संघटनेने पुन्हा ९ जुलैपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. १० दिवसानंतरही या आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. कोणत्याही सभेला न जाणे, वरिष्ठांना कोणतेही अहवाल न देणे, ग्राम पंचायत तपासणीकरीता दप्तर न दाखविणे असे या आंदोलनाचे स्वरुप असून, यामध्ये सर्व ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामकाजाचा खोळंबा झाला आहे. सदर आंदोलन अधिक तिव्र करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष आत्माराम नवघरे, जिल्हा सचिव अरूण इंगळे यांनी दिला.


Web Title: Gramsevak's determination to intensify the non-cooperation movement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.