गोंडेगाव धरणाचा कालवा फुटला; २० नागरिकांच्या घरात पाणी घुसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 16:38 IST2022-01-30T16:38:18+5:302022-01-30T16:38:24+5:30
Gondegaon dam canal bursts : कालवा फुटल्यामुळे उमरी बु. येथील २० नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

गोंडेगाव धरणाचा कालवा फुटला; २० नागरिकांच्या घरात पाणी घुसले!
फुलउमरी : मानोरा तालुक्यातील गोंडेगाव धरणाचा कालवा फुटल्यामुळे उमरी बु. येथील २० नागरिकांच्या घरांत पाणी शिरल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
मानोरा तालुक्यातील गोंडेगाव येथे लघु सिंचन विभागातर्फे धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणाचा कालवा शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास फुटल्यामुळे घरांत पाणी घुसले. यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. काही नागरिकांचे स्नानगृह, शौचालय जमीनदोस्त झाले तर काही नागरिकांच्या गोठ्यात पाणी शिरल्यामुळे रात्रीच्या सुमारास जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. उमरी बु. येथील दुगार्बाई धूळभरे, कुंडलिक सावंत, अजय बर्डे, देवराव बर्डे, प्रभाकर बर्डे, भावराव पट्टेबहादूर, अंकुश पट्टेबहादूर , सुदाम पट्टेबहादूर, बाळू धूळभरे, राधाबाई धूळभरे, कुंडलिक ढवळे, रामभाऊ बर्डे, ज्ञानेश्वर वानखडे, अविनाश शेळके, निलेश सावंत, गणेश सावंत, रवी सावंत, अमर पट्टेबहादूर, अनिल सावंत यांचे घरात पाणी धुसल्यामुळे घरातील धान्य भिजले तसेच इतर साहित्याची नासधूस झाली.
गोठ्यात शिरले पाणी!
रात्रीच्या सुमारास अनेकांच्या गोठ्यात पाणी शिरल्यामुळे जनावरांची गैरसोय झाली. अनेकांनी रात्रीच्या सुमारास सुरक्षित ठिकाणी जनावरे हलविली.
प्राथमिक अहवाल सादर होणार
घटनेची माहिती मिळताच लघु पाट बंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता अंजली भावसार यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार संदेश किर्दक, तलाठी भिदे यांनी सुद्धा नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयास सादर करणार आहेत.