भिंत अंगावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 17:45 IST2021-09-09T17:44:47+5:302021-09-09T17:45:07+5:30
Washim News : भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.

भिंत अंगावर पडल्याने मुलगी गंभीर जखमी
वाशिम : पुरातनकालिन मातीची भिंत अंगावर पडल्याने अडोळी येथील १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. पुढील उपचारार्थ या मुलीला नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे घरात पाणी शिरणे, भिंतीची पडझड आदी घटना घडत आहेत. अडोळी येथे बुद्ध विहाराच्या सभोवताल पुरातनकालिन मातीची भिंत आहे. बुद्ध विहाराच्या मागच्या बाजूला प्रवीण किसन पडघान हे आपल्या कुटुंबासह राहतात. प्रवीण पडघान यांची पत्नी कविता आणि १० वर्षाची मुलगी परी या दोघी मायलेकी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी जात असताना, अचानक परी हिच्या अंगावर भिंत कोसळली. यामध्ये ती पूर्णत: बुजून गेल्याने कविता पडघान यांनी आरडाओरड करताच, आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळ गाठले. माती उकरून गंभीर जखमी अवस्थेत परीला बाहेर काढण्यात आले. यावेळी ती बेशुद्धावस्थेत असल्याने तातडीने उपचारार्थ वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. येथे प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले.
दानशूरांच्या मदतीची गरज!
प्रवीण पडघान यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, ते नागपूर येथील उपचार व राहण्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. मुलीची मृत्यूशी झूंज सुरू असून, उपचाराच्या खर्चासाठी पडघान यांना दानशूरांच्या मदतीची गरज आहे.