विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व समुपदेशन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:06 IST2020-05-18T16:06:42+5:302020-05-18T16:06:54+5:30
समुपदेशकांना विद्यार्थी व पालक सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात.

विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व समुपदेशन!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या पुढाकाराने व शिक्षण विभाग तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना फोनव्दारे विनामूल्य मार्गदर्शन व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा त्यांच्या प्रश्नांना शास्त्रीय उत्तरे मिळावीत. त्यांना करिअर विषयी, शासनाच्या विविध सुविधा तसेच दहावी बारावी नंतर काय? अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन व समुपदेशन मिळावे यासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. एनसीईआरटी दिल्ली तर्फे महाराष्ट्रासाठी १० समुपदेशकांची यादी डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु. एनसीआरटी.एनआयसी.इन या वेबसाईट वर तर आय व्ही जी एस या संस्थेच्या ४०३ समुपदेशकांची यादी , तसेच विविध जिल्ह्यांच्या जिल्हा समुपदेशक यांची यादी , मार्गदर्शन केंद्रे यामध्ये उपलब्ध आहेत.
यापैकी कोणत्याही समुपदेशकांना विद्यार्थी व पालक सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत फोन करून मार्गदर्शन मिळवू शकतात. कलचाचणी व इतर अधिक माहिती, मार्गदर्शन तथा समुपदेशनासाठी जिल्हा समुपदेशक राजेश दयाराम सुर्वे यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप, फेसबुकद्वारे तथा प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहन जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता शिवशंकर मोरे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी तथा पालकांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
करिअर विषयी, शासनाच्या विविध सुविधा तसेच दहावी बारावी नंतर काय? अशा विविध प्रकारचे मार्गदर्शन याव्दारे विद्यार्थ्यांना मिळत असल्याने त्यांच्यामधील संभ्रम दूर होण्यास मदत होत आहे.
अनेक शिक्षण संस्थांच्यावतिने विद्यार्थ्यांना आॅनलाईनचे धडे
कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर शाळा बंद असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना आॅनलाईन धडे देणे सुरु केले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकरिता जिल्हयातील अनेक शाळा, संस्थांनी हा उपक्रम हाती घेवून विद्यार्थ्यांना होम वर्कसह मार्गदर्शन केल्या जात आहे.
शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक (प्राथमिक तथा माध्यमिक) यांनी विद्यार्थी व पालक यांना या समुपदेशन व मार्गदर्शन सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करावे.
- प्रेमला खरटमोल
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम.
नुकताच १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी इयत्ता दहावीच्या कल व अभिक्षमता चाचणीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला आहे. वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्या अनुषंगानेही प्रश्न असल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी संपर्क करून मार्गदर्शन सेवेचा लाभ घ्यावा.
- तानाजी नरळे.
शिक्षणाधिकारी माध्यमिक,
जिल्हा परिषद वाशिम.