१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:23 IST2019-02-04T16:22:58+5:302019-02-04T16:23:21+5:30
या उपक्रमांतर्गत दहाव्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ पुस्तकांचा संच सोमवारी मोफत वितरित करण्यात आला.

१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे अनु. जाती प्रवर्गातील युवकांना स्पर्धा परीक्षेचे मोफत पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमांतर्गत दहाव्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ पुस्तकांचा संच सोमवारी मोफत वितरित करण्यात आला.
गत दहा वर्षांपासून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी लिपिकवर्गीय पदासाठी चार महिन्याचे नि:शुल्क स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. मोफत पुस्तक संच वितरण कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व उदघाटक म्हणून सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड (आयपीएस) तर अध्यक्षस्थानी पायरू इंगोले, प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याण संचालनालयाचे सेवानिवृत्त सचिव आर. के. गायकवाड, प्रा. चंदू सिरसाट, सुभद्रा इंगोले, डॉ. सहदेव चंद्रशेखर, दौलतराव हिवराळे, डॉ. रामकृष्ण कालापाड, कृषी सहाय्यक अनिल इंगोले आदींची उपस्थिती होती.
प्रकल्प समन्वयक संजय इंगोले यांनी प्रास्ताविक केले. पवन बनसोड यांनी स्पर्धा परीक्षेतील वेळेचे नियोजन आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चिकाटी आणि सातत्य याबद्दल मार्गदर्शन केले. बनसोड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. समुपदेशक निता भालेराव, डॉ. सहदेव चंद्रशेखर, दौलतराव हिवराळे, डॉ. कालापाड, अनिल इंगोले यांनी मार्गदर्शन केले. सतीश इंगोले यांनी संचालन तर प्रा. अमोल बोरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पायरू इंगोले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल प्रसेनजीत धडे, प्रा. विनोद राऊत, संतोष पाईकराव, आशिष इंगोले यांनी परिश्रम घेतले.