चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित!
By Admin | Updated: March 30, 2017 02:44 IST2017-03-30T02:44:13+5:302017-03-30T02:44:13+5:30
२0१२ पासून मिळाली नाही रक्कम; शालेय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित!
वाशिम, दि. २९- शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून विविध स्वरूपात शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यात यश मिळविणार्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. मात्र, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील सुमारे चार हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले असताना त्यांना कुठल्याच प्रकारचे अर्थसहाय्य शासन स्तरावरून झालेले नाही.
पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जायची. त्यात गतवर्षीपासून बदल होत पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांंसाठी ही परीक्षा घेतली जाते. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता इयत्ता आठवीमध्ये एनएमएमएस नावाची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नॅशनल टॅलेंट सर्च (एनटीएस) ही देखील शिष्यवृत्तीचीच परीक्षा असून, ती दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांंकरिता आयोजित केली जाते. तथापि, सन २0१२ पासून या तीनही प्रकारच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांंची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. संबंधित विद्यार्थ्यांंना शासनाच्या ध्येय-धोरणानुसार देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना शासन स्तरावरून एकाही विद्यार्थ्यास गेल्या पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या या परीक्षा केवळ तकलादू ठरत असून, विद्यार्थी, पालकांसोबतच शाळांच्या मुख्याध्यापकांचीदेखील यामुळे डोकेदुखी वाढली आहे.