द्रुतगती महामार्गाला पाणंद रस्त्याचे रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:22 IST2021-02-05T09:22:30+5:302021-02-05T09:22:30+5:30
शेलूबाजार: नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत या मार्गाला पाणंद रस्त्याचेच रूप प्राप्त झाले आहे. ...

द्रुतगती महामार्गाला पाणंद रस्त्याचे रूप
शेलूबाजार: नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सद्यस्थितीत या मार्गाला पाणंद रस्त्याचेच रूप प्राप्त झाले आहे. याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकविण्यासाठी जीव मुठीत घेऊन चालकांना वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे, दुरवस्थेमुळे या रस्त्यावर दर महिन्यात अपघात घडतात आणि त्यात काहींना जीवही गमवावा लागत आहे.
नागपूर-औरंगाबाद या द्रुतगती मार्गाची निर्मिती झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाददरम्यान जड वाहतूक करणाऱ्या चालकांना मोठा आधार झालाच, शिवाय हा मार्ग शेलूबाजार परिसरातील गावातून जात असल्याने, या भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला होता. तथापि, सततची जड वाहतूक आणि संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या मार्गाला अवकळा येऊ लागली. त्यात या द्रुतगती मार्गावर शेलूबाजार परिसरात सोनाळा, चोरद, लाठी, शेलूबाजार, तऱ्हाळादरम्यानच्या अंतरात एवढे खड्डे पडले आहेत की, ते मोजणेही शक्य नाही. विशेष म्हणजे, खड्ड्यांचा आकारही दिवसेंदिवस वाढतच असल्याने, हा मार्ग म्हणजे एखाद्या पाणंद रस्त्यासारखाच झाला आहे. मार्गावरील खड्डे चुकविण्यासाठी चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे. या खड्ड्यांतून वाह उसळल्यानंतर होणाऱ्या आवाजामुळे मार्गालगतच्या गावातील लोकांची झोप मोड होते. एखादा अपघात तर घडला नाही ना, अशी शंका येत असल्याने ते पाहायलाही धावतात.
------------
कडा खचल्याने अपघातात वाढ
नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालक हे खड्डे चुकवून रस्त्याच्या कडेने वाहन चालवित आहेत. या सततच्या प्रकारामुळे आता मार्गाच्या दोन्ही कडाही खचून खाली गेल्या आहेत. आता एखादे वाहन समोरून आल्यानंतर मार्ग मोकळा सोडण्यासाठी चालकांना मार्गाच्या खाली वाहन उतरविणेही घातक ठरत आहे. या प्रकारामुळे अपघातात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत याच प्रकारातून येथे दोन बळी गेले आहेत.
===Photopath===
290121\29wsm_4_29012021_35.jpg
===Caption===
द्रुतगती महामार्गाला पाणंद रस्त्याचे रुप