जखमी प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन विभागाचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:41 IST2018-07-07T18:36:48+5:302018-07-07T18:41:28+5:30
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

जखमी प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी वन विभागाचे प्रयत्न
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी अकोला विभागांतर्गत जागांची निवड करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, अकोला जिल्ह्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर आता वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे.
प्रादेशिक वन विभाग अकोला अंतर्गत प्रादेशिक जंगलाचे प्रमाण लक्षणीय आहे. या जंगलात विविध जातींच्या वन्यजीवांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये प्रामुख्याने हरीण, चितळ, काळविट, निलगाय, भेकर, कोल्हा, रानडुक्कर या प्राण्यांची संख्या मोठी असून, अस्वल आणि बिबट्यांचे प्रमाणही चांगले आहे. हे वन्यप्राणी चारा-पाण्याच्या शोधात सतत इकडे, तिकडे भटकतात, अशात एखादवेळी रस्त्यावर आल्यानंतर वाहनांच्या धडकेमुळे अपघात घडून काही प्राण्यांना जीव गमवावा लागतो, तर काही प्राणी जखमी होतात. किरकोळ जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर जुजबी उपचार करून त्यांना जंगलात सोडणे शक्य असते; परंतु गंभीर जखमी झालेल्या प्राण्यांवर दीर्घ उपचार करणे आवश्यक असते. अशा उपचारासाठी त्यांना ठेवण्याची व्यवस्था असणे गरजेचे असते. एक प्रशस्त इमारत आणि पिंजरे त्यासाठी आवश्यक असतात; परंतु अकोला वन विभागांतर्गत अशा सुविधांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उपचाराअभावी अनेक वन्य प्राण्यांचा जीवही गेला आहे. ही बाब लक्षात घेऊन जखमी वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करता यावेत म्हणून त्यांना ठेवण्यासाठी वन्यजीव अनाथालय उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील काम पूर्ण झाले असून, आता वाशिम जिल्ह्यात जागांची निश्चिती करण्यासाठी प्रादेशिक वन विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी वाशिम, मानोरा आणि कारंजा या तीन तालुक्यांची निवड झाली असल्याचे कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरे यांनी सांगितले आहे.