शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनाने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांच्या आंदोलनाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:02 IST2018-03-09T14:02:35+5:302018-03-09T14:02:35+5:30
वाशिम - विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस, आशा व गटप्रवर्तक (आयटक) संघटनेच्यावतीने ८ मार्च रोजी धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्वासनाने पोषण आहार स्वयंपाकी, मदतनिसांच्या आंदोलनाची सांगता
वाशिम - विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस, आशा व गटप्रवर्तक (आयटक) संघटनेच्यावतीने ८ मार्च रोजी धरणे व उपोषण आंदोलन करण्यात आले. शिक्षणाधिकाºयांनी लेखी आश्वासन दिल्याने गुरूवारी सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन, भाजीपाला, इंंधन देयक रखडले आहे. यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीस, आशा व गटप्रवर्तक (आयटक) संघटनेने ८ मार्चला जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे व उपोषण आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड, भाकपचे जिल्हा सचिव व महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे राज्य अध्यक्ष कॉ. संजय मंडवधरे, सहसचिव कॉ. संजय बाजड यांनी केले. त्रिपुरा व मेरठ येथे महापुरूषांचे पुतळे पाडण्याच्या घटनेचा व व हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. रखडलेले मानधन व अन्य देयके तातडीने देण्यात यावे, आशा व गटप्रवर्तक यांचे जिल्हा पातळीवरील प्रश्न तात्काळ तातडीने निकाली काढण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलन स्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष ज्योती गणेशपूरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर व शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक राठोड यांनी भेट दिली. शिक्षण विभागाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शालेय पोषण आहार कर्मचाºयांचे विविध प्रश्नांवर शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी संघटनेला लेखी आश्वासन दिले. रखडलेले मानधन व अन्य देयके लवकरात लवकर खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली. यामुळे गुरूवारी सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनुराधा काळे, रेखा लहाने, हरिभाऊ पवार, बेबी भगत, चित्रा भगत, ज्योती वाघमारे, वर्षा नांगरे, मथुरा पौळकर, नंदा कांबळे, छाया पवार, नितीन तायडे, साहेबराव राठोड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.