भरजहागीर... पारंपरिक शेतीला फाटा देत, भरजहागीर येथील अनेक शेतकरी कुटुंबातील शेतकरी प्रायोगिक तत्त्वावर नवनवीन पिकांची लागवड करून जादा उत्पादनासाठी अश्वगंधा पिकाचा अभ्यास करीत आहेत. भरजहागीर येथील सखुबाई उद्धव काळे या महिलेने आपल्या मुलांच्या सहकार्याने थेट ‘अश्वगंधा’ पिकाची लागवड करीत या पिकाचा प्रयोग यशस्वी केला आहे.
एकत्रित कुटुंबाची विभागणी होत एका कुटुंबाचे अनेक कुटुंबं होत आहेत. त्याचप्रमाणे शेतीचीसुद्धा विभागणी होत, हल्ली अनेक कुटुंबातील सदस्यांच्या वाट्याला गुंठेवारीत शेती येत आहे. परंतु, गुंठेवारी किंवा अत्यल्प भूधारकांना पारंपरिक पिकामधून म्हणावा तसे उत्पन्न मिळत नसल्याने आता वेगवेगळ्या किंवा आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज झालेली आहे. येथील सखुबाई काळे यांनी दीड एकर संत्रा पिकाची लागवड केली आहे. परंतु, संत्रा पिकाला चार ते पाच वर्षे फळधारणेला वेळ लागतो. त्यामुळे संत्रा पिकामध्ये अवघे वीस गुंठे ‘अश्वगंधा’ पिकाची लागवड केली. सदर पीक या परिसरातील वातावरणाशी समतोल होते का नाही, या भीतीपोटी प्रथम अवघ्या वीस गुंठ्यावर अश्वगंधा लागवड केली. सदर पिकाच्या उत्पन्न खरेदीचा एका खासगीतील कंपनीशी करार केला. अश्वगंधाचे मूळ तीस हजार रुपये क्विंटल, पाने, झाड कुट्टी आठ हजार रुपये क्विंटल तर बियाणे वीस हजार रुपये क्विंटलप्रमाणे करार केला. या पिकाला आयुर्वेदामध्ये मोठी मागणी असून अश्वगंधा पिकाला रासायनिक फवारणी, वन्यप्राणी वा कुठल्याच रोगराईचा धोका नाही. सदर पिकाच्या लागवडीसाठी बियाणेव्यतिरिक्त इतर कुठलाच खर्च लागला नाही. हल्ली वीस गुंठ्यावर एक लाखाच्या आसपास उत्पन्न मिळत असल्याने हे पीक लागवडीची आवड निर्माण झाली आहे, असे काळे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. काळे यांनी शेतावर प्रायोगिक तत्त्वावर जरी अश्वगंधा पिकाची लागवड केली असली तरी या नवीन पिकाची माहिती घेण्यासाठी काही शेतकरी महिला बचत गटांनी त्यांच्या शेतावर भेटी देत माहिती घेतली आहे. सखुबाई उद्धव काळे यांचा मुलगा मध्यप्रदेशातील निमजगाव मंडी येथे प्रसिद्ध असलेल्या अश्वगंधा बाजारपेठेला भेट देत अधिक माहिती घेण्याचाही प्रयत्न करीत आहे.