‘त्या’प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करा! ग्रामस्थांची तहसील, पोलिस ठाण्यात धडक
By संतोष वानखडे | Updated: May 15, 2023 16:10 IST2023-05-15T16:09:44+5:302023-05-15T16:10:15+5:30
पारवा शिवारातील प्रकरण.

‘त्या’प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करा! ग्रामस्थांची तहसील, पोलिस ठाण्यात धडक
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील १४ वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन ईतर आरोपींवर सुद्धा कारवाई करावी, या मागणीसाठी तालुक्यातील पारवा, बोरव्हा, लखमापूर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन १५ मे रोजी मंगरूळपीर तहसील, पोलिस ठाण्यात धडक दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद आहे की, ७ मे रोजी पारवा येथील १४ वर्षीय मुलगा कृष्णा सावके हा दुपारी २ वाजताच्या दरम्यान घरून मुलांसोबत खेळायला गेला होता. परंतु परत आला नाही. यानंतर ८ मे रोजी त्याचा मृतदेह शेतात आढळुन आला. याप्रकरणी पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने चौकशी केली असता, या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजू रामकृष्ण मयघणे (वय ३७) रा. पारवा अटक केली आहे व भा.दं.वि. चे कलम ३६३, ३०४, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपीसोबत इतरही आरोपीचा सहभाग असण्याची दाट शंका आहे. तरी सुध्दा पोलिसांनी इतर आरोपींना अटक केली नाही. तसेच आरोपींनी सदर मुलाचा खुन केला असताना आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे निवेदनात नमूद केले.
आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तडीपार करावे व ईतर आरोपींवर सुद्धा कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी महिला,पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.