शेतकर्यांनी सोडली तहसीलमध्ये जनावरे
By Admin | Updated: July 18, 2014 01:02 IST2014-07-18T01:02:05+5:302014-07-18T01:02:44+5:30
भुर येथील शेतकर्यांचे अभिनव आंदोलन : पांदण रस्ता दुरूस्तीची मागणी

शेतकर्यांनी सोडली तहसीलमध्ये जनावरे
मंगरूळपीर : भुर येथील शेतकर्यांनी पांदण रस्ता दुरूस्त करण्यात यावा, या मागणीसाठी १७ जुलैला तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या आवारात आपल्या जनावरांना सोडून अनोखे आंदोलन केले.
भुर येथे लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या धरणात पांदण रस्ता बुडीत क्षेत्रात गेला होता. परिणामी, शेतकर्यांना नाहक त्रास सोसावा लागत होता. या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकर्यांनी प्रशासनाकडे वारंवार रेटुन धरली होती. याबाबत निवेदनेही दिली होती. प्रशासकीय यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. गत आठ दिवसांपूर्वी याच मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला होता; मात्र अधिकार्यांनी सदर निवेदनाला केराची टोपली दाखविली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भुर येथील शेतकर्यांनी १७ जुलैला येथील तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात आपली जनावरे सोडली. भुरवासीयांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी तहसील परिसरात मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकार्यांच्या कक्षात आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले, यावेळी शेतकर्यांसोबत उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार बळवंत अरखराव, लघुपाटबंधारे विभागाचे पाठक यांच्या समोर शेतकर्यांनी आपल्या अडचणी मांडल्या, यावेळी वरिष्ठांसोबत चर्चा केल्यावर ३0 दिवसाचे आत पांदण रस्ता तयार करून देण्याबाबत लेखी आश्वासन दिले, त्यानंतर भुरवासीयांनी सदर आंदोलन मागे घेतले.