शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केली पाणंद रस्त्याची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:57+5:302021-02-06T05:16:57+5:30
पोहा येथील पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने शेतीत वाहन नेणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले होते. प्रामुख्याने पावसाळ्यात या रस्त्यावर ...

शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून केली पाणंद रस्त्याची निर्मिती
पोहा येथील पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने शेतीत वाहन नेणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले होते. प्रामुख्याने पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होत असल्याने खरीप हंगामात अनेक अडचणी उद्भवत होत्या. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे या रस्त्याचे काम करण्याची मागणीही केली होती; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर गावातील शेतकऱ्यांनीच हा रस्ता करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी तब्बल २ लाख रुपये लोकवर्गणीतून गोळा केले आणि पाणंद रस्त्याचे कामही पूर्ण केले. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी या रस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांचे कौतुक केले.
-------------------
जलपातळीला आधार
पोहा येथे शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून पाणंद रस्त्याचे काम करताना पूर्वीचा खोदून तेथे खोल नाली तयार केली आणि या खोदकामातून निघालेली माती व मुरुमाच्या आधारे नवा रस्ता तयार केला. त्यामुळे नालीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पातळी टिकून राहण्यास मोठा आधार झाला.
-------------------
शेतकऱ्यांनी जमीनही दिली
शेतीच्या वहिवाटीची समस्या दूर करण्यासाठी पाणंद रस्त्याची निर्मिती करताना शेतकऱ्यांनी केवळ लोकवर्गणीच केली नाही, तर रस्ता दर्जेदार आणि चांगला व्हावा म्हणून पूर्वीचा रस्ता खोदला. त्यामुळे नवा रस्ता करण्यासाठी जमिनीची अडचण येणार होती. शेतकऱ्यांनी यासाठीही स्वत: पुढाकार घेतला आणि ज्या शेतकऱ्यांची शेती या रस्त्यालगत येते. त्यांनी जमीनही दिली.