भीषण पाणीटंचाई : जनावरांना लागणारे पाणीही घ्यावे लागतेय विकत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:22 IST2018-04-03T15:22:52+5:302018-04-03T15:22:52+5:30
वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे.

भीषण पाणीटंचाई : जनावरांना लागणारे पाणीही घ्यावे लागतेय विकत!
वाशिम : शेतीला सक्षम जोडधंदा म्हणून ओळखणारा जाणारा दुग्धव्यवसाय सद्या पुरता अडचणीत सापडला असून दुष्काळसदृष स्थिती आणि भीषण पाणीटंचाईमुळे जनावरे पोसणे कठीण झाले आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे ग्रामीण भागातील जलस्त्रोत कोरडे पडल्याने दुधाळ जनावरांना पिण्याकरिता तथा त्यांच्या अंगावर घालण्याकरिता लागणारे पाणी पशुपालकांना चक्क विकत घ्यावे लागत आहे. होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने दैनंदिन नुकसान होत असल्याचा सूर पशुपालकांमधून उमटत आहे.
जिल्ह्यात आजमितीस ३ लाखांपेक्षा अधिक पशूधन असल्याची नोंद जिल्हा पशूसंवर्धन विभागाकडे आहे. त्यापैकी दुधाळ गायी व म्हशींची संख्या १ लाख २८ हजार आहे. याआधारे जेमतेम शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाची कास धरून आपला उदरनिर्वाह चालविला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या पर्जन्यमानात सातत्याने झालेली घट आणि विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे शेतीसोबतच दुग्धव्यवसाय देखील धोक्यात सापडला आहे. यंदा तर जिल्ह्यातील १३० पैकी १०० च्या वर सिंचन प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून विहिरी, हातपंप, कुपनलिकांची पाणीपातळीही खोलवर गेल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, केवळ दुग्धव्यवसायावरच उपजिविका अवलंबून असलेल्या काही पशूपालकांनी आपल्या जनावरांसाठी लागणारे पिण्याचे पाणी चक्क विकत घेणे सुरू केले आहे. ही स्थिती आगामी काही दिवसांमध्ये अधिकच गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुधाळ जनावरांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत आहे. याशिवाय त्यांच्या अंगावरही पाणी घालावे लागते; अन्यथा त्यांच्यापासून मिळणाºया दुधावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक पशूपालकांना खासगीत पाण्याचे टँकर विकत घेवून ही गरज भागवावी लागत आहे.
- डॉ. भागवत महाले, पशूधन पर्यवेक्षक, पशुवैद्यकीय दवाखाना, तांदळी-शेवई