आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

By Admin | Updated: April 19, 2017 01:08 IST2017-04-19T01:08:57+5:302017-04-19T01:08:57+5:30

वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही.

Eight thousand agricultural pump connections pending! | आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

जिल्ह्यातील वास्तव : बहुतांश अर्ज दोन वर्षांपूर्वीचे!

वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही. यातील ७० टक्के अर्ज दोन वर्षांपूर्वीचे असून, अनुकूल वातावरणातही काम संथगतीने होत असल्याने शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्यावतीने सिंचन, विहिरी, शेततळे, सूक्ष्म सिंचन योजनांसारखे उपक्रम शासनाच्यावतीने राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरीही उत्सुक आहेत; परंतु प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या बव्हंशी योजनांचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यात प्रामुख्याने कृषी पंपांच्या रखडलेल्या वीज जोडण्यांचा मुद्दा समाविष्ट आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७९४ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये २०११-१२ पासून ते २०१५-१६ पर्यंतच्या ५ हजार ७९५ जोडण्यांचा समावेश आहे, तर यंदा मार्च अखेरपर्यंत आणखी २ हजार ९९९ श्ेतकऱ्यांनी कृषी पंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातही पायाभूत सुधारणा आराखडा-२ आणि विशेष अनुदानांतर्गत एकूण ६ हजार ५४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामधील पायाभूत सुधारणा आराखडा-२ मधील ६४९ जोडण्यांसाठी १४.५२ कोटी, तर विशेष अनुदान योजनेंतगर्तच्या ३ हजार ६६६ जोडण्यांसाठी ४५.६९ कोटींचा नियतव्यय उपलब्ध असल्याची माहिती असून, मार्च अखेर या दोन्ही योजनांत प्रलंबित असलेल्या एकूण ६ हजार ६४ कृषी वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी म्हणून २१.९७ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतात पिके असल्यामुळे कृषी पंप जोडण्यांची कामे प्रामुख्याने प्रलंबित राहतात. तथापि, जिल्ह्यातील बव्हंशी क्षेत्र खरीप हंगामानंतर मोकळे असते. वीज जोडणीच नसल्यामुळे अनेक शेतकरी सिंचनही करू शकत नसल्याने या एप्रिलपासून कृषी पंप जोडण्यांच्या कामाला वेग मिळणे अपेक्षित असते; परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती २०११ पासून आजवरच्या सहा वर्षांच्या कालावधित कृषी पंप जोडण्यांच्या वाढतच असलेल्या संख्येवरून दिसत आहे. जिल्ह्यातील विभागवार प्रलंबित वीज जोडण्यांचा विचार केल्यास वाशिम उपविभागात १ हजार ५०९ जोडण्या प्रलंबित आहेत. मालेगावात १ हजार ४७४, रिसोडमध्ये १ हजार ४७३, मंगरुळपीर उपविभागात ४८५, मानोऱ्यात १ हजार १७५, तर कारंजा उपविभागात १ हजार ८९६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत.

जिल्ह्यातील प्रलंबित कृषी पंप जोडणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यासाठी टेंडरिंंगचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत ६० टक्क्यांहून अधिक वीज जोडण्यांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. यासंदर्भात सर्व कंत्राटदारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
-दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम.

Web Title: Eight thousand agricultural pump connections pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.