मध्यंतरीच्या काळात कोरोनाचे संकट तसेच जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचे वाढलेले दर यामुळे गतवर्षी दिवाळीच्या आधीपासूनच खाद्यतेलाचे दर वाढायला सुरुवात झाली. कालांतराने सर्वच खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले. यामुळे विशेषत: गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट पूर्णत: विस्कळीत झाले होते. रोजमजुरीचे काम करणाऱ्यांची खाद्यतेल दरवाढीमुळे मोठी फसगत झाली. शासनाकडून दर कमी करण्यासंबंधी ठोस उपाययोजना होत नसल्याने सर्वच स्तरांतून रोष व्यक्त झाला. आता मात्र खाद्यतेलाचे दर काहीअंशी कमी झाल्याने बहुतांश नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
.................
तेलाचे दर (प्रति लिटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन १५३/१४७
सूर्यफूल १७०/१६०
करडी २००/१८५
पामतेल १४५/१४२
शेंगदाणा १६०/१५५
मोहरी १७०/१६०
तीळ १९०/१८०
..........................
म्हणून दर झाले कमी
वाशिम शहरासह जिल्ह्यात सोयाबीनच्या तेलालाच सर्वाधिक मागणी आहे. नेमक्या या तेलाचे दर वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात वाढले होते. ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे दर लिटरमागे १५३ होते, ते आता १४७ वर स्थिरावले आहेत. तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर कमी झाल्याने दर कमी झाले आहेत.
- रुपेश दागडिया, व्यापारी
...............
किराणा खर्चात बचत
खाद्यतेलाचे दर ज्या तुलनेत वाढले, त्या तुलनेत कमी झालेले नाहीत. त्यामुळे विशेष दिलासा मिळालेला नाही. असे असले तरी किराणा साहित्यावर माहेवारी होणाऱ्या खर्चात काहीअंशी आता बचत होणार आहे. शासनाने दर आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
- रुपाली शिंदे
.......................
घरात स्वयंपाकासाठी सोयाबीनच्याच तेलाचा वापर केला जातो. नेमक्या याच तेलाचा दर गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने बजेट विस्कळित झाले. आता खाद्यतेलाचे दर कमी झाले; मात्र ते ज्या प्रमाणात व्हायला हवे होते, त्या प्रमाणात झालेले नाही.
- धनश्री बनसोड