दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:35 IST2018-11-25T17:34:35+5:302018-11-25T17:35:30+5:30
वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत

दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने महावितरणने कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी दिला.
यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शासनाने जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. जऊळका रेल्वे महसूल मंडळात १६ गावांचा समावेश आहे. उमरी महसूल मंडळात १५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडीत न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने या सवलतींचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न पडला आहे. थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा शेतकºयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वनाथ सानप यांनी दिला.