चालकाची डुलकी अन् समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माय-लेकीचा जागीच मृत्यू!
By संतोष वानखडे | Updated: December 28, 2022 16:06 IST2022-12-28T15:59:43+5:302022-12-28T16:06:08+5:30
नागपूर निवासी जोशी कुटुंब हे मुंबई येथील आपले काम आटोपून समृद्धी महामार्गाने २८ डिसेंबरला नागपूरकडे जात होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास कारंजा पासून १० किलोमीटर अंतरावर चालकाचा डोळा लागल्याने थेट गाडी रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरदार आदळून तीन ते चार वेळा उलटली.

चालकाची डुलकी अन् समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; माय-लेकीचा जागीच मृत्यू!
वाशिम :कार चालवताना चालकाचा डोळा लागला आणि कार थेट रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरदार आदळून तीन ते चार वेळा उलटली. २८ डिसेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील धानोरा (ता.कारंजा) गावानजीक घडलेल्या या अपघातात कारमधील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. आदिती अजय जोशी (४०) व आनंदी अजय जोशी (४) रा. नागपूर, अशी मृतक माय-लेकीची नावे आहेत.
नागपूर निवासी जोशी कुटुंब हे मुंबई येथील आपले काम आटोपून समृद्धी महामार्गाने २८ डिसेंबरला नागपूरकडे जात होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास कारंजा पासून १० किलोमीटर अंतरावर चालकाचा डोळा लागल्याने थेट गाडी रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरदार आदळून तीन ते चार वेळा उलटली. या भीषण अपघातात कारमधील आनंदी जोशी ही बालिका रस्त्याच्या खाली १०० फूट अंतरावर फेकल्या गेली. रस्त्याच्या खाली गवत असल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी एक ते दीड तास लागला. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. आनंदी ही मृतावस्थेत आढळली.
या अपघातात आनंदची आइ आदिती जोशी या देखील जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी हायवे लोकेशन १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तसेच अन्य रुग्णवाहिकेतून विशाल डांबरे, विधाता चव्हाण, अजय घोडेस्वार, अमोल गोडवे, विनोद खोंड, रमेश देशमुख आदींनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आरोही जोशी (१४) व ॲड अजय जोशी (५२) यांना रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.