मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 04:00 PM2020-02-17T16:00:48+5:302020-02-17T16:00:55+5:30

ली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

Disappearance of girls from Washim; increase police headache | मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

googlenewsNext

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात यापुर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन ७६ पैकी ६० मुलींचा शोध लागला असला तरी १६ मुली नेमक्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागेना. अशातच १४ फेब्रूवारी रोजी शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जांब अढाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली. तथापि, मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.
सन २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४९ मुलींचा शोध लागला; मात्र राज्यभरातील अनेक जिल्हे पिंजून काढल्यानंतरही पोलिसांना १३ मुलींचा आजतागायत थांगपत्ता लागलेला नाही. असे असताना जानेवारी २०२० या एकाच महिन्यात तब्बल १४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने तातडीची पावले उचलत तथा तपासचक्र गतीने फिरवून ११ मुलींचा शोध घेतला; मात्र ३ मुली आजही बेपत्ताच आहेत.
विशेष बाब म्हणजे वाशिम शहरातून १९ फेब्रूवारीला बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहचले. वाशिम जिल्हा पोलिस दलाने याप्रकरणी मुलीचे नातेवाईक, मित्र-मैत्रीणींकडे सातत्याने चौकशी केली. अनेक ठिकाणचे सीसी फुटेजही तपासण्यात आले; मात्र त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही. याच प्रकरणी पोलिसांनी तपासकार्याला अधिक गती द्यावी, अशी मागणी पुढे रेटत वाशिममध्ये ७ फेब्रूवारीला भव्य स्वरूपात जनआक्रोश मोर्चा देखील निघाला होता, हे विशेष. असे असताना सदर मुलीचा आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही.


सरपंच संघटनेचा मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार
वाशिम शहरातून १९ जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुलीसह इतरही अनेक अल्पवयीन मुलींचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. घडलेल्या सर्वच प्रकरणांचा तातडीने छडा लावावा, अशा आशयाचे पत्र वाशिम जिल्हा सरपंच संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.


मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी प्रशासन घेणार पुढाकार
जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. संबंधित मुलींचा शोध घेण्याचा सर्वंकष प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हा प्रशासनही शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी पुढाकार घेणार असून जिल्ह्यातील पालकांनीही त्यास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे मत वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी व्यक्त केले.


जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाचे सर्वच पातळीवर युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तांत्रीक बाबी तपासण्याची जबाबदारी ‘सायबर सेल’कडे सोपविण्यात आली असून प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मिसींग सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. पोलिस आपले काम इमानेइतबारे करित आहे, पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलामुलींच्या प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

Web Title: Disappearance of girls from Washim; increase police headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.