कुरळावासीयांची तहान भागविण्यासाठी अवतरला ‘देव’राव ; पाईपलाईन टाकून गावात आणले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:22 IST2018-05-02T15:22:05+5:302018-05-02T15:22:05+5:30
देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले.

कुरळावासीयांची तहान भागविण्यासाठी अवतरला ‘देव’राव ; पाईपलाईन टाकून गावात आणले पाणी
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील १५०० लोकवस्तीच्या कुरळा या गावातील सर्वच जलस्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. ही स्थिती लक्षात घेवून गावातीलच देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुरळा या गावात सार्वजनिक वापराच्या चार विहिरी आणि पाच हातपंप आहेत. मात्र, यापैकी कुठल्याच जलस्त्रोतास सद्या पाणी शिल्लक राहिलेले नाही. परिणामी, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या विपरित परिस्थितीवर मात करण्यासाठी देवराव घुगे यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत स्वखर्चाने १२०० मीटर पाईपलाईन टाकत आपल्या शेतातील कुपनलिकेचे पाणी गावालगतच्या मंदाबाई घुगे यांच्या विहिरीत सोडले. यामाध्यमातून अर्धेअधिक गाव पाणीटंचाईमुक्त झाले असून उर्वरित गावासाठी रमेशराव घुगे यांनी शेतातून पाईपलाईन टाकून गावात पाणी आणले आहे.
पिकांपेक्षा गावकºयांची तहान महत्वाची- देवराव घुगे
माझ्या शेतातील कुपनलिकेला मुबलक पाणी आहे. यामाध्यमातून मी विविध स्वरूपातील पिके घेवू शकतो; परंतु अशा पद्धतीने मिळणाºया पैशांपेक्षा माझ्या गावातील नागरिकांची तहान भागणे महत्वाचे आहे. त्यामुळेच मी सर्व पाणी गावकºयांसाठी उपलब्ध केल्याचे देवराव घुगे यांनी सांगितले.