जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:27 IST2021-05-05T11:27:45+5:302021-05-05T11:27:53+5:30

Government Covid hospitals did not get specialist doctors : खासगी डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.

Despite the advertisement, the government Covid hospitals did not get specialist doctors | जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना

जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. दोन वेळा जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने शेवटी खासगी डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर २०२० पर्यंत झेपावलेला कोरोनाचा आलेख नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत प्रचंड खाली घसरला. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. 
कोरोनाबाधितांवर योग्य उपचार मिळावे याकरीता जिल्ह्यात आठ सरकारी कोविड केअर सेंटर व तीन सरकारी कोविड हॉस्पिटल आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये ८९० खाटांची व्यवस्था आहे. ६२६ खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था, ५१ खाटांना एनआयव्ही व ३२ खाटांना बायपॅप मशीनची सुविधा आहे. कोरोना योद्धे म्हणून काम करणारे सरकारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. गेल्या एक वर्षापासून अथकपणे कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या या योद्ध्यांवर सध्या अधिक ताण आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. 
तसेच येत्या काही दिवसांत आणखी काही खाटांची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी एम.डी. मेडिसिन, चेस्ट फिजिशियन, भूलतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासणार असून ही पदे भरण्यासाठी दोन वेळा जाहिरातदेखील देण्यात आली. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. 
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे सध्या दोन एम.डी. डॉक्टर आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याने सध्याच्या कोरोना संसगार्मुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जिल्ह्यातील खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा शासकीय हॉस्पिटलमध्ये द्यावी, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे. याला प्रतिसाद देत सध्या एक खासगी भूलतज्ज्ञ व सर्जन यांनी विनामूल्य सेवा देण्याला होकार दिला आहे. खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत येऊन जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.


रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आणखी काही खाटांचे नियोजन आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आजच्या परिस्थितीत खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत येऊन जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे. 
- शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम


जिल्हा कोविड रुग्णालयात सध्या दोन एम.डी. डॉक्टर उपलब्ध आहेत. जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. दोन खासगी डॉक्टर विनामूल्य सेवा देण्यासाठी समोर आले आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.    

        - डॉ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
 

Web Title: Despite the advertisement, the government Covid hospitals did not get specialist doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.