ठेचून ठार केलेला ‘तो’ इसम निघाला हैद्राबादचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:14 IST2020-01-05T15:14:48+5:302020-01-05T15:14:57+5:30

अनोळखी इसम हैद्राबाद येथील असून चिखली झोलेबाबा येथील दोघांनी त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले

The deceased man from Hyderabad | ठेचून ठार केलेला ‘तो’ इसम निघाला हैद्राबादचा

ठेचून ठार केलेला ‘तो’ इसम निघाला हैद्राबादचा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सोयता येथे १७ डिसेंबर २०१९ रोजी ठेचून ठार केलेल्या तथा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिस तपासात ‘तो’ अनोळखी इसम हैद्राबाद येथील असून चिखली झोलेबाबा येथील दोघांनी त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आव्हानात्मक स्वरूपातील या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर २०१९ रोजी सोयता येथील सुधाकर राऊत यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले, की अतीक्रमीत जमिनीवरील तुरीच्या पिकात अनोळखी इसम मृतावस्थेत पडून आहे. त्याच्या डोक्यावरील केस व अंगावरील मास जनावराने खाल्ले असून चेहरा कुजलेल्या स्थितीत आहे. त्यावरून जऊळका पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला. यादरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी एलसीबीकडे प्रकरण वळते करून तपास करण्याचे निर्देश दिले. जउळका, सोयता, भोयता, पिंप्री अवगन, चिखली, शेलूबाजार आदीठिकाणी तपास करण्यात आला. अशात ३१ डिसेंबर रोजी शवविच्छेदन अहवालावरून ही हत्याच असल्याचे निष्पन्न झाल्याने अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गोपनिय माहितीवरून चिखली झोलेबाबा येथील शुभम खंडारे व त्याचा मित्र संजय जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघांनीही गुन्ह्याची कबूली दिली. मृतक इसम हा हैदराबाद येथील राहणारा असून त्याचे नाव रमेशबाबू अच्छा आहे. मृतकास जमिनीतील धन (सोने) काढण्याची लालच देऊन शेतात नेले व त्याची हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले. दोघांनाही ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: The deceased man from Hyderabad