राज्यात मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले, तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. पुरामुळे अनेक घरे आणि झोपड्या वाहून गेलेल्या आहेत, छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसाय चालविणे अशक्य झालेले आहे. मजुरांच्या हाताला काम नाही. रुग्णालयात पुरेसा औषध पुरवठा नसल्यामुळे गरिबांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पिकांच्या नासाडीचे पंचनामे कुर्म गतीने होत आहेत. महाराष्ट्रभर पसरलेल्या जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती पाहून काळजी व्यक्त केलेली आहे. या संबंधित जमात-ए-इस्लामी हिंद शाखा रिसोडने २४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पीक नुकसानीचे पंचनामे त्वरित गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदतीचे वितरण करण्यात यावे. कच्च्या घरांची आणि झोपड्यांच्या झालेल्या हानीचे सुद्धा पंचनामे करून त्यांनाही तत्काळ आर्थिक सहायता प्रदान करण्यात यावी. शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना पुन्हा जीवन जगण्याची संधी देण्यात यावी. कोविड दरम्यान मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना शेख रिजवान, शेख वकार, प्रा.मो. जुनेद,मकसूद अहमद मोइनुद्दीन आदी उपस्थित होते.
रिसोड तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST