पंचायत समितीवर अपंगांचा मोर्चा
By Admin | Updated: February 17, 2015 01:46 IST2015-02-17T01:46:42+5:302015-02-17T01:46:42+5:30
लेखी आश्वासनाने मोर्चाची सांगता.

पंचायत समितीवर अपंगांचा मोर्चा
वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या १९९५ च्या अपंग पुनर्वसन कायद्यानुसार ३ टक्के निधी अपंगांसाठी खर्च करणे तसेच प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत गावातील अपंगाची जन्म-मृत्यू नोंदणीच्या आधारावर नोंदणी करावी या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने सोमवार १६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र सहसचिव मनीष भा. डांगे यांच्या नेतृत्वात रिसोड पंचायत समितीवर विशाल मोर्चा धडकला.
यावेळी मोर्चेकरूंनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. गटविकास अधिकारी घंसाळकर व सभापती यशोदा भाग्यवंत, गजानन भाग्यवंत यांनी मोर्चेकरूंचे निवेदन स्वीकारून निवेदनातील मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले.
हा मोर्चा डफडे वाजवत बसस्थानकापासून निघून मार्गे लोणी फाटा, आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन समोरून रिसोड पंचायत समितीवर धडकला. मोर्चामध्ये अपंग बांधव तसेच संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महिलांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. रिसोड तालुक्यातील सर्व ८0 ग्रामपंचायतींमध्ये अपंगांच्या नोंदणी २0 मार्च २0१५ पर्यंत घेतल्या जातील, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये स्वनिधीच्या किमान ३ टक्के एवढा निधी खर्च ३१ मार्चपर्यंत करण्यात येईल, ग्रामपंचायत ठराव घेऊन ग्रामपंचायत स्तरावर अपंग लाभार्थींची निवड करण्यात येईल, झालेल्या खर्चाचा एकत्रित अहवाल २0 एप्रिलनंतर देण्यात येईल, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकार्यांनी यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाला दिले.