वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
By Admin | Updated: April 17, 2017 02:29 IST2017-04-17T02:29:54+5:302017-04-17T02:29:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : रस्ता रुंदीकरणाचे काम, वृक्षतोड थांबविण्याची मागणी

वृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार
वाशिम : शहर सौंदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. यासंदर्भात सिव्हिल लाइनसह अन्य भागातील नागरिकांनी वृक्ष वाचविण्यासाठी पुढाकार घेत शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, रविवारीदेखील वृक्षप्रेमींनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वृक्ष वाचविण्याची मागणी केली.
वाशिम शहरात रस्ता रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान, रस्ता रुंदीकरणासाठी मार्गालगत असलेली झाडे तोडली जाणार असल्याची माहिती आहे. गत दोन वर्षाआधी आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले, तेव्हादेखील त्या रस्त्यावरील ४० ते ५० झाडे कापण्यात आली होती. ते अद्याप लावण्यात आलेली नाही. आता पुन्हा आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन रस्त्यावरील झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. एकीकडे शासन कोट्यवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्षतोड होत असल्याने याकडे जिल्हाधिकारी तसेच संबंधितानी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सिव्हिल लाइन भागातील रहिवासी तथा जय बजरंग मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी चर्चा केली. डॉ. बाबासाहेब अांबेडकर चौक ते सिव्हिल लाइन, जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान रस्ता रुंदीकरण काम करताना वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी केली.
तसेच सिव्हिल लाइन भागातील रस्ता रुंदीकरणाच्या निमित्ताने होणाऱ्या वृक्षतोडीला थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन १५ एप्रिल रोजी राजे उदाराम कॉलनी, सिव्हिल लाइन भागातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनासह संबंधितांना दिले आहे.
रस्ता रुंदीकरण कार्यक्रमांतर्गत सिव्हिल लाइन भागात रेखांकन झाले आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा अनेक वर्षांपासून झाडे आहेत. जवळपास विविध १६० वृक्ष या रस्त्यावर असून, या वृक्षाची तोड रस्ता रुंदीकरणासाठी होऊ शकते, अशी शक्यता निवेदनातून नागरिकांनी वर्तविली. वृक्षतोड होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली.
राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहूद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वृक्षतोड थांबविण्याची मागणी केली. शहरातील आंबेडकर चौक ते सिव्हिल लाइन या भागातील नगर परिषद प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. त्यानुसार रस्ता रुंदीकरण, सौंदर्यीकरण करताना वृक्षांची कत्तल होणार आहे. या बाबीचा निषेध करत राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुद्देशीय संस्था, वाशिमच्यावतीने वृक्षतोड थांबविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.