बसचे ब्रेक फेल झाले... चालकाचे प्रसंगावधान अन् वाचले ५० प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:02 IST2022-08-20T14:58:30+5:302022-08-20T15:02:46+5:30
बसचे ब्रेक फेल असल्याचे लक्षात येताच चालक आशिष सोहागपुरे यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवली.

बसचे ब्रेक फेल झाले... चालकाचे प्रसंगावधान अन् वाचले ५० प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?
वाशिम - महामंडळाच्या बसगाड्यांत अनेकदा मार्गावर तांत्रिक बिघाड उद्भवून बिकट स्थिती ओढवते आणि त्यातून प्रवाशांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर वाशिम-मंगरुळपीरदरम्यान कळंबा महालीनजिक घडली. बसचे ब्रेक फेल असल्याचे लक्षात येताच चालक आशिष सोहागपुरे यांनी रस्त्याच्या कडेला बस थांबवली. त्यामुळे बसमधील ५० प्रवाशांचे प्राण वाचले.
बडनेरा आगाराची एमएच- १२, ईएफ ६३३९ क्रमांकाची हिंगोली-अमरावती ही बस शनिवार २० ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वाशिम बसस्थानकातून वाशिम-मंगरुळपीर मार्गे अमरावतीकडे निघाली. या बसमध्ये ५० प्रवासी होते. ही बस मार्गावरील कळंबा महालीपासून काही अंतरावर गेल्यानंतर बसचा वेग कमी अधिक करताना बसचे ब्रेक फेल असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे पुढे बिकट प्रसंग ओढवून अपघाताची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी गिअरवर चटकन नियंत्रित करून बस रस्त्याच्या कडेला नेत थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळून प्रवाशांचे प्राण वाचले.