रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास
By सुनील काकडे | Updated: February 4, 2024 16:33 IST2024-02-04T16:33:05+5:302024-02-04T16:33:56+5:30
भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली.

रिसोडात भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड येथील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील रहिवासी बाबाराव कोडापे हे घराला कुलूप लावून त्यांच्या पत्नीसह बाहेर पडताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांचा डाव साधला. भरदिवसा घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली.
यासंदर्भात बाबाराव कोडापे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास ते घराला कुलूप लावून त्यांच्या पत्नीसोबत अंगणवाडीशी संबंधित कामासाठी गेले होते. काम आटोपून दुपारी २ वाजता घरी परतले असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटल्याचे त्यांना दिसून आले. घरातील बेडरूममध्ये असलेले दोन्ही कपाट उघडे व त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले.
चोरट्यांनी सोन्याची अंगठी, चेन, मंगळसूत्र, कानातील झुमके, चांदिचे जोडवे यासह आठ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, घटनेची माहिती रिसोड पोलिसांना दिल्यानंतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. वाशिम येथून श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले. पुढील तपास रिसोड पोलिस करीत असून या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.