कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 15:13 IST2019-12-23T15:13:41+5:302019-12-23T15:13:51+5:30
हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ५० हजारांपेक्षा अधिक कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्यात आले असून यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यात महावितरणच्या कृषीपंपधारकधारक ग्राहकांची संख्या ५१ हजार २६८ आहे. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणारा विद्यूत पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर मोटारपंपाजवळ न जाताच ‘रिमोट’व्दारे पंप सुरू करता यावा, यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी मोटारपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविण्याचा प्रकार अवलंबिला आहे; मात्र, केवळ काही क्षणाच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी मोटारपंपांना बसविण्यात आलेले ‘ऑटो स्विच’ अत्यंत धोकादायक ठरत आहेत. सद्या ग्रामीण भागात ठराविक कालावधीत विजेचे भारनियमन केले जात आहे. यादरम्यान विजपुरवठा सुरळित होताच एकाचवेळी सर्व संबंधित शेतकरी रिमोटव्दारे शेतांमधील मोटारपंप सुरू करतात. यामुळे वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त ताण येण्यासोबतच रोहित्र जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याशिवाय मोटारपंपही नादुरूस्त होत असल्याने मोटारपंपाचे ‘ऑटो स्विच’ काढून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी कृषीपंपांना ‘ऑटो स्विच’ बसविलेले आहेत. अधूनमधून खंडित होणारा वीज पुरवठा पुर्ववत झाल्यानंतर ‘ऑटो स्विच’व्दारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मोटारपंप सुरू होत असल्याने रोहित्रावर ताण येऊन ते जळण्याचा प्रकार वाढला आहे. शेतकºयांनी ‘ऑटो स्विच’ काढून टाकायला हवे.
- व्ही.बी. बेथारिया,
अधीक्षक अभियंता, महावितरण