कारंजात ऑटोचालकाचा दोन बहिणींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 00:08 IST2025-03-03T00:08:34+5:302025-03-03T00:08:55+5:30

ऑटो चालकावर गुन्हा दाखल

Auto driver tries to rape two sisters in Karanjat | कारंजात ऑटोचालकाचा दोन बहिणींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

कारंजात ऑटोचालकाचा दोन बहिणींवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

कारंजा (वाशिम) : ऑटो चालकाने मित्राच्या साहाय्याने दोन सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनी प्रसंगावधान राखत धावत्या ऑटोतून उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना १ मार्च रोजी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास दारव्हा - यवतमाळ रस्त्यावरील रामनगर ते कारंजा मार्गावर, रेल्वे रुळांच्या जवळ घडल्याची माहिती पोलिसांनी २ मार्च रोजी दिली.

कारंजा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी २० वर्षीय मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. १ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत तिच्या लहान बहिणीचा दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने ती बहिणीसह रामनगर (पिंप्री फॉरेस्ट), ता. कारंजा येथे आली होती.

पेपर संपल्यानंतर दुपारी २:१५ वाजता, परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या ऑटो (एमएच १६ बी ९५८९) चालकाला तिने ‘रामनगर फाटा येथे जायचे आहे’ असे सांगितले. चालकाने होकार भरल्यावर दोघी बहिणी ऑटोमध्ये बसल्या. मात्र, आधीच त्यात एक व्यक्ती उपस्थित होता. ऑटो रामनगर फाट्याकडे निघाला असता, सुमारे २ ते ३ किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळांच्या थोड्या अगोदर चालकाने ऑटो थांबवला आणि जोरजोराने गाणी वाजवू लागला.

याला फिर्यादीने विरोध केला असता, चालकाने दोघींना परत ऑटोत बसवले आणि ऑटो वेगाने पळवला. यादरम्यान, चालकाने साइड ग्लासमधून दोघींकडे पाहून अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता, त्याने वाईट उद्देशाने ऑटो मुख्य रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने वळवला. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी धावत्या ऑटोतून उड्या मारल्या आणि धावत मुख्य रस्त्यावर येऊन जीव वाचवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऑटोचालक पंकज महादेव राठोड व त्याचा साथीदार (दोघेही रा. जनुना, ता. कारंजा) यांच्याविरुद्ध कलम ७९, ३ (५) बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. विनोद महाकाळ करत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज राठोड याला अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.

२४ तासानंतर दिली माहिती
कारंजा येथे घडलेल्या घटनेची माहिती पोलिस विभागाने तब्बल २४ तासानंतर माध्यमांना दिली. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना पोलिसांकडून अशा घटनांबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका या घटनेबाबत उपस्थित केली जात आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याची माहिती लपविण्याचा प्रकार घडला असेल तर त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. पुन्हा असा प्रकार घडणार नाही, यासाठी उपाययोजना केल्या जातील.

- प्रदीप पाडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी, कारंजा

Web Title: Auto driver tries to rape two sisters in Karanjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम