नशिबी असे कसे हे मरण; स्मशानभूमीअभावी पाऊसपाण्याने अर्ध्यावरती विझले सरण
By सुनील काकडे | Updated: July 13, 2022 17:42 IST2022-07-13T17:08:54+5:302022-07-13T17:42:17+5:30
शेंदूरजना आढाव या गावाचा विकास सर्वच पातळ्यांवर खुंटला असून स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना उघड्यावरच अंत्यविधी पार पाडावा लागतो.

नशिबी असे कसे हे मरण; स्मशानभूमीअभावी पाऊसपाण्याने अर्ध्यावरती विझले सरण
वाशिम: जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेंदुरजना आढाव (ता.मानोरा) येथील ज्येष्ठ नागरिक वाघू जाधव यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी सोमवार, ११ जुलै रोजी निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकरी, नातेवाईक जमले आणि अंत्ययात्रा काढण्यात आली. गावकऱ्यांसाठी सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने मृतदेहाला उघड्यावर चिताग्नी देण्यात आला; मात्र अशात पाऊस सुरू झाल्याने सरण अर्ध्यावरती विझले. या घटनेने उपस्थितांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शेंदूरजना आढाव या गावाचा विकास सर्वच पातळ्यांवर खुंटला असून स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना उघड्यावरच अंत्यविधी पार पाडावा लागतो. पावसाळ्यात ही समस्या उग्ररुप धारण करते. अग्नी दिलेले सरण पावसाचे पाणी पडून अर्ध्यावरती विझण्याचा प्रकार या दिवसांत नेहमीच घडतो. शासन-प्रशासन मात्र यासंदर्भात गंभीर नसून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांशी कुणालाच काही देणे-घेणे नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गावकऱ्यांमधून याप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.