भर जहागीर येथील हलाखीच्या परिस्थितीमधील राधेश्याम सुरूशे या युवकाच्या हातचे काम कोरोना महामारीने हिरावले. गावकुसामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढेसुध्दा रोज मजुरीचे काम हाताला मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधात गावापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कापडसिंगी या गावी जात असताना कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकलचा अपघात झाला आणि राधेश्यामच्या उजव्या पायाला जबर मार लागला. त्याला वाशिम येथे एका खासगी रुग्णालयामध्ये भरती केल्यानंतर सुमारे दीड लाख खर्च सांगण्यात आला. यासंदर्भात ‘ लोकमत’मध्ये ‘राधेश्यामच्या मदतीसाठी सरसावले सवंगडी’ हे वृत्त प्रकाशित झाले आणि व्हाॅटस्-ॲप ग्रुपच्या माध्यमातून सुमारे चाळीस मित्रांनी शंभर रुपयांपासून ते तब्बल पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक मदतीसाठी पुढाकार घेतला आणि एकूण चाळीस हजारांची आर्थिक मदत जमा केली. ही रक्कम राधेश्याम सुरूशे यांच्या पत्नीकडे सुपूर्द केली. एवढेच नाही, तर वाशिम येथील खासगी रुग्णालयातील डाॅक्टरांनी, काही मित्रांनी संपर्क करीत राधेश्यामच्या हलाखीच्या परिस्थितीची आपबीती मांडल्याने डाॅक्टरांनीसुध्दा ऑपरेशनच्या खर्चामध्ये मोठी कपात करून सहकार्य केले. या मदतीवरून ‘मित्रासाठी कायपण’चा प्रत्यय युवकांनी दाखवून दिला.
‘मित्रासाठी कायपण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST