शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार
By नंदकिशोर नारे | Updated: November 11, 2023 16:41 IST2023-11-11T16:40:20+5:302023-11-11T16:41:34+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत १ डिसेंबरपासून प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड; विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन लागणार
वाशिम : यापुढे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना नोंदवावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील अटेंडन्स बाॅटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड वाढला आहे.
शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत व्हावी, यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईअंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
विद्या समीक्षा केंद्र, पुणेमार्फत अटेंडन्स बाॅट (चॅटबॉट)च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्रस्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील अटेंडन्स बाॅटद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया १ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांना या अटेंडन्स बॉटवर (चॅटबॉट)वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र:
सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना या अटेंडन्स बॉटवर (चॅटबॉट)वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, न.प., मनपा प्रशासन अधिकारी, सर्व शिक्षण निरीक्षकांना ३ नोव्हेंबर रोजी समग्र शिक्षा महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबईच्या राज्य प्रकल्प संचालकांनी पत्र दिले आहे.
शिक्षकांवर आणखी एका ॲपचा लोड:
राज्यातील शिक्षक आधीच अशैक्षणिक आणि विविध ॲपचा वापर करून अक्षरश: वैतागले आहेत, त्यांना विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी वेळच मिळत नाही, अशात आता अटेंडन्स बोट नावाचे आणखी एका ॲप्लिकेशनचा त्यांच्यावर लोड येणार आहे.