कुपोषित बालकांसाठी आता अंगणवाडी स्तरावर उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:35 IST2017-12-26T13:33:46+5:302017-12-26T13:35:59+5:30
वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे.

कुपोषित बालकांसाठी आता अंगणवाडी स्तरावर उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था!
वाशिम - कुपोषित बालकांसाठी उपचार व पोषण आहाराची विशेष व्यवस्था अंगणवाडी स्तरावर केली जाणार आहे. त्यादृष्टीने कुपोषित बालकांची चाचपणी केली जात असून, विशेष तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र कुपोषित असे वर्गीकरण केले जाणार आहे.
कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. कुपोषित बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषक आहार दिला जातो. तीव्र कुपोषित गटातील बालकांना अंगणवाडी स्तरावरच ग्राम बालविकास केंद्रातून तीन महिने सतत उपचार मिळण्याची सुविधा आता उपलब्ध केली जाणार आहे. वाशिम जिल्हयात १०७६ च्या आसपास अंगणवाडी केंद्र आहेत. अतितीव्र व तीव्र गटातील बालकांना विशेष पोषक आहार व उपचार मिळावे, यासाठी ग्राम बाल विकास केंद्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. बालकांचे वर्गीकरण करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. तत्पूर्वी बालविकास प्रकल्प अधिकारी स्तरावरून अंगणवाडी केंद्र स्तरावर चाचपणी केली जात आहे. बालकांचे वजन, उंची, लांबी व दंडघेर घेऊन बालकांचे वर्गीकरण करणे आणि तिव्र कुपोषित आढळून आल्यास त्या बालकाला ग्राम बालविकास केंद्रात अतिरिक्त पोषक आहार, पोषक तत्वांचा अतिरिक्त डोज व औषधी देणे, अशी ही व्यवस्था राहणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आदींच्या उपस्थितीत अतितीव्र, तीव्र गटातील कुपोषित बालकांची देखरेख केली जाणार आहे. तपासणी मोहिमेतून अतितीव्र, तीव्र गटातील बालकांची संख्या निश्चित झाल्यानंतर ग्राम बालविकास केंद्रांची संख्या ठरविली जाणार आहे.