जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 04:49 PM2021-01-07T16:49:38+5:302021-01-07T16:49:48+5:30

Gram Panchayat Election शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकले नाहीत.

Aliance in Zilla Parishad; Gram Panchayat elections go awry! | जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

जिल्हा परिषदेत आघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत बिघाडी!

Next

- संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व सत्ता स्थापनेसाठी एकजूट दाखविणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे तिनही पक्ष व स्थानिक नेते ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकत्र येऊ शकले नाहीत. पॅनल, आघाडीच्या नावाखाली स्थानिक पातळीवर निवडणूक लढविली जात असून, यामध्ये कुणाची सरशी होणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बहुतांश निवडणूका या महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातही जानेवारी २०२० मध्ये महाविकास आघाडीच्या नावाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्यात आल्या होता. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन भाजपा व जिल्हा जनविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काही गट, गणाचा अपवाद वगळता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा एकत्रितपणे सांभाळली. एका वर्षानंतर कोरोनाकाळात जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्याने स्थानिक पातळीवर पॅनल, आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रितपणे प्रचार करणारे सेना, कॉंग्रेस व राकॉंचे स्थानिक नेते, कार्यकर्ते हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात मात्र अनेक ठिकाणी एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होत आहे.
 
निकालानंतर दावे, प्रतिदावे
ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष किंवा महाविकास आघाडीच्या नावाखाली लढविली जात नाही. मात्र, निवडणूक निकालानंतर ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात, एवढ्या ग्रामपंचायतींवर आमचाच झेंडा, असे दावे, प्रतिदावे पक्ष व नेत्यांकडून करण्यात येते. निवडणूक निकालानंतर दावे, प्रतिदाव्यावरूनही राजकारण तापविले जाते.
 
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही. स्थानिक पातळीवर पॅनल, आघाडीतर्फे निवडणूक लढविली जाते.
- चंद्रकांत ठाकरे,
जिल्हाध्यक्ष राकॉं
 
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी नाही. निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीबाबत ठरविले जाईल.
- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक,
जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
 
ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढविण्यात येते. या निवडणुकीत महाविकास आघाडी झालेली नाही.
- सुरेश मापारी,
जिल्हा प्रमुख, शिवसेना

Web Title: Aliance in Zilla Parishad; Gram Panchayat elections go awry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.