अकोला-वाशिम महामार्गावर : ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:29 IST2019-10-04T15:29:27+5:302019-10-04T15:29:47+5:30
रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अकोला-वाशिम महामार्गावर : ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार
एक गंभीर: मालेगाव तालुक्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी (वाशिम): ट्रकची जबर धडक लागून घडलेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीपैकी पती जागेवरच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना अकोला-वाशिम महामार्गावर मालेगाव तालुक्यातील रिधोरा फाट्यानजिक शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश राठोड, असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांची पत्नी संगीता रमेश राठोड या गंभीर जखमी आहेत. हे दोघेही मोठी उमरी अकोला येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी ट्रक व चालक ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एच.आर. ७४, ए. ५४९० क्रमांकाचा ट्रक अकोलाहून मालेगावकडे येत होता. त्याचवेळी रमेश राठोड हे त्यांच्या पत्नी संगीता राठोड यांच्यासह एम.एच-३०, एझेड ७६१ क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाव येथून रिधोराकडे जात होते. रिधोरा फाट्यानजिक त्यांच्या दुचाकीला उपरोक्त क्रमांकाच्या ट्रकची जबर धडक लागली. त्यात रमेश प्रेमसिंग राठोड (४५) हे जागेवरच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी संगीता रमेश राठोड गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी ट्रकचालक मो. नूर बिलाल ताहीर (३२), रा. गंडुरी ता. फे्रजपूर झटका, (हरियाणा) याला ट्रकसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.