मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 16:38 IST2021-02-21T16:38:39+5:302021-02-21T16:38:45+5:30
Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लग्न समारंभामध्ये केवळ ५० व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार असून, या उपस्थितीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक करण्यात आले. कोरोनाविषयक नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना १० हजार किंवा प्रति व्यक्ती २०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. दुसºयांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील केले जाणार आहे. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही. तसे आढळल्यास नियमानुसार गुन्हाही दाखल करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला. आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नगर परिषद, पोलीस प्रशासनानेदेखील मंगल कार्यालय, लॉन, सभागृहांना भेटी देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.